पवित्र शास्त्रातील नीतिसूत्रे ह्या पुस्तकात सात गोष्टींची एक यादी आहे. त्या गोष्टी परमेश्वराला आवडत नाहीत. त्यांचा तो द्वेष करतो. त्याला त्यांचा वीट आहे. (नीतिसूत्रे ६:१६-१९)
१. गर्विष्ठ डोळे
२. लबाड जीभ
३. निर्दोष रक्त पाडणारे हात
४. दुष्ट योजना आखणारे हृदय
५. दुष्कर्म करायला उतावळे पाय
६. खोटा साक्षीदार
७. लोकांना एकमेकांविरुद्ध भडकावणारा माणूस
परमेश्वर ज्या गोष्टींचा तिरस्कार करतो, त्या आपल्यात आहेत का ह्याविषयी आपण स्वतःचे परीक्षण केले पाहिजे. आपले डोळे, आपली जीभ, आपले हात, पाय, हृदय, मन, हे त्यांनी करू नयेत ती कामे करत आहेत का? आपले हे अवयव आपल्या नियंत्रणाबाहेर गेले आहेत का? असे जर असेल तर आपण त्यावर उपाय केला पाहिजेत. आणि तो उपायसुद्धा पवित्र शास्त्रात संगितलेला आहे. (नीतिसूत्रे ३:१-११)
“तू पूर्ण मनाने परमेश्वरावर भाव ठेव. स्वतःच्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस. काहीही करताना त्याचा विचार कर आणि तो तुला सरळ मार्ग दाखवील.
“प्रेम आणि विश्वासूपणा कधी सोडू नकोस. म्हणजे तुला मानसन्मान मिळेल.
“स्वतःच्याच दृष्टीने स्वतःला शहाणा समजू नकोस. परमेश्वराचे भय धर आणि वाइटापासून दूर रहा. म्हणजे तुला आरोग्य प्राप्त होईल.
“तुझ्या संपत्तीने परमेश्वराला मान दे. म्हणजे तुझी कोठारे भरलेली राहतील. परमेश्वराची शिकवण तुच्छ मानू नकोस.”